अमळनेर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शिरसाळे या गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी घराबाहेर ठेवलेल्या चावीने घराचे कुलूप उघडत कपाटातून 62 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावात शेतकरी असलेले भटू शिवदास पाटील ( वय- ५० वर्ष ) हे राहायला आहेत. बुधवार, १५ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून ५० हजारांची रोकड तसेच १२ हजारांचे दागिने असा एकूण ६२ हजारांचा ऐवज लांबवला. भटू पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुरुवारी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार भरत ईशी हे करीत आहेत.