भुसावळ (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभागाने तिकीट तपासणी मोहीम राबवून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एक दिवसात १७ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळविले आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव – धुळे; जलंब-खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहीम यशस्वी झाली.
वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफ जवान यांचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ७० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. हि मोहीम यशस्वी करण्यासाठी ३ अधिकारी व तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व आरपीएफ स्टाफ असे एकूण ४२ टीम तयार करून कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. एकूण ३ हजार २२ प्रकरणाद्वारे एकूण १७ लाख ३० हजार रुपये वसूल करण्यात आले.
प्रवास करताना योग्य ते तिकीट घ्या व ज्या श्रेणीचे तिकीट आहे त्या श्रेणीतच प्रवास करावा. जर रांगेत उभे न राहता तिकीट हवे असेल तर आपण युटीएस ॲपचा वापर करावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.