अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा असल्याचे केंद्रीय मंत्री खा. रामदास आठ्वले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रविवारी शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असं आठवले म्हणाले. मात्र यामुळे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे काय होणार ? याबद्ल चर्चा सुरु झाली आहे.
शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे भव्य अधिवेशन होणार असून मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. नागालॅंड सारख्या प्रदेशात रिपाईंचे आमदार निवडून आलेत. महाराष्ट्रात का निवडून येऊ शकत नाही यावर विचार मंथन होणार आहे. मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी नाही. पक्षातील इतरांनाही संधी मिळावी. दोन ते तीन महामंडळे मिळावी, असा प्रस्ताव सरकार पुढे ठेवला असल्याचं आठवलेंनी सांगितलं.
केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा. आरपीआयला एक मंत्रीपद दिलं जावं. राज्यपाल नियुक्त आमदारात आरपीआयला एक जागा मिळावी. महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर निवडून येणे अशक्य आहे. मित्र पक्षाने आम्हाला सहकार्य करावं. येत्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा आणि विधानसभेत १५ जागा आरपीआयला मिळाव्यात, अशीही अपेक्षा खा. आठवले यांनी भाजपाकडे केली आहे.