जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महिलांसाठी स्तनांचे कर्करोग : उपचार व तपासणी करण्यासाठी बुधवारी दि. ८ मार्च रोजी विशेष ओपीडीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे विविध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्तन कर्करोग : जनजागृती व उपचार अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दर बुधवारी महिलांसाठी विशेष ओपीडीला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बुधवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने स्तन कर्करोग जनजागृतीसाठी विशेष ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप अधिष्ठाता तथा शल्याच चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारुती पोटे, अधिसेविका प्रणिता गायकवाड, उपक्रम नोडल अधिकारी डॉ. संगीता गावित यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
ही ओपीडी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओपीडी कक्ष क्र. ११४ ब येथे सुरु करण्यात आली आहे. तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना मोफत केस पेपर देण्यात येणार आहे.