जळगाव ([प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त पेालीस निरिक्षकाने वडीलांच्या अंत्यसंस्कारावेळी स्वत:च्या ताब्यातील रिव्हाल्व्हर निष्काळजीपणाने वापरले होते. तसेच, त्यांच्या मुलानेदेखील विनाकारण फायर करतांना अंत्यसंस्काराला उपस्थित एका वृद्धाला गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्हृयात जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकास २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर मुलाला सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
विठ्ठल श्रावण मोहकर असे शिक्षा झालेल्या सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या.एस.आर.पवार यांनी सोमवार, ६ मार्च रोजी हा निकाल दिला. धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे मोहकर यांच्या वडीलांचे ११ मे २०१९ रोजी निधन झाले होते. पिंप्री गावातील स्मशानभूमीत अंत्यविधीचा कार्यक्रम सुरु असतांना, विठ्ठल मोहकर यांनी त्यांच्याकडून रिव्हाल्वरने आकाशाच्या दिशेने दोन राउंड फायर केले होते, त्यानंतर विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दिपक मोहकर यानेहि वडील विठ्ठल मोहकर यांच्याकडून रिव्हाल्व्हर घेवून फायर करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, बंदुकीची गोळी हि अंत्यसंस्काराला उपस्थित तुकाराम वना बडगुजर (वय ६५ रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत तुकाराम बडगुजर यांचे नातेवाईक राजू कृष्णा बडगुजर यांच्या तक्रारीवरुन विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दिपक मोहकर यांच्याविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जळगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
सरकारपक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याअंती न्या. एस.आर.पवार यांनी आरोपी विठ्ठल मोहकर यांना २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार ६ महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती तर दिपक मोहकर याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले तर, पैरवी अधिकारी म्हणून हर्षवधन सपकाळे यांनी सहकार्य केले.