जळगाव ( प्रतिनिधी ) – मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील वापर जैन हिल्सवरील संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर दिसत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत शेतीचा विश्वास निर्माण होत आहे; असे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.
जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. अभ्यास दौरावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डी. एम. बऱ्हाटे, श्रीराम पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी व शेतकरी उपस्थित होते. गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत. याठिकाणी आधुनिक शेती करीत असतांना मुख्य भेडसावणार प्रश्न म्हणजे मजुरांची टंचाई यासाठी यांत्रिकरणाचा सुरेख संगम दिसते. आगामी शेती आणि सद्यस्थितीमधील शेतीतील प्रश्न यावर येथे शाश्वत उपाय सापडतात. कोरडवाहू फळबाग लागवड, कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढता येईल याचे प्रात्यक्षिक जैन हिल्सवर बघायला मिळते. शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कमी खर्चाची शाश्वत उत्पादन घेण्याची सांगड याठिकाणी दिसून येत असल्याचे अनिल भोकरे म्हणाले. तंत्रज्ञानातून किफायतशीर काटेकोर पद्धतीने शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना गवसत आहे. माझ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत यातून शेतीवरचा वाढता खर्च कमी करून योग्य तो सकारात्मक बदलांसह कांद्याची किफायतशीर शेती कशी करावी असा संदेश या अभ्यास दौरातून मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषिविभागातील अधिकारी, अभ्यासक यासह शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.