जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील ढाके नगरात मध्यरात्री दरोडेखोरांनी हातात शस्त्र घेवून कुटूंबाला धमकावत घरातून ५० हजाराची रोकड, सोन्याची चैन आणि दुचाकी घेवून पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील ढाके नगरात प्रमोद विठ्ठल घाडगे (वय-५९) हे पत्नी व मुलासह राहायला आहेत. त्यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. मुलगा सुद्धा प्रमोद घाडगे यांच्यासोबत कुरिअरचाच व्यवसाय करतो. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुऱ्हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती त्यापैकी खालच्या खोलीत झोपलेल्या प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दररोखोराने पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. तसेच घरात कोण – कोण आहे हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले. यानंतर तिघांना खाली बसून दरोडेखोर पुन्हा वरती गेले कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी ५० हजाराची रोकड तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेतली तसेच बाहेर अंगणात हातातील लाकडं फेकून घाडगे यांची सोबत घेत त्या दुचाकीवरून पोबारा गेला. या घटनेनंतर घाडगे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.