जळगाव ( प्रतिनिधी ) – महाविद्यालयीन युवक-युवतींनी अतिशय जोमदारपणे भाग घेतलेल्या जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या जळगाव केंद्रावर शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीत मुळजी जेठा महाविद्यालयाच्या “कंदील” व नूतन मराठा महाविद्यालयाच्या “माय भवानी” या दोन एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. जी एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील जळगाव केंद्राची प्राथमिक फेरी शनिवारी येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मोठय़ा उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील अनेक महाविद्यालयांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी मुजे महाविद्यालय व नूतन मराठा महाविद्यालयातील दोन संघाच्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. नागपूर येथील नियोजित नाटय़गृहात येत्या २५ व २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी रंगणार आहे. यात विजेत्या संघाला ५१ हजार रुपये, द्वितीय संघास ३१ हजार रुपये तर तृतीय संघास २१ हजार रुपये रोख व इतर पुरस्कार दिले जाणार आहे. याशिवाय व्यक्तिगत व उत्तेजनार्थ पुरस्कारही दिले जातील. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी परिवर्तन संस्थेचे नाट्यकर्मी हर्शल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‘जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन’ने या स्पध्रेद्वारे युवा कलाकारांना फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा त्यांनी डोळसपणे उपयोग करून घ्यायला हवा, असे मत नोंदवले. तसेच या स्पर्धेचे समन्वय जी.एच. रायसोनी करंडकच्या मुख्य समन्वयिका मृणाल नाईक व रायसोनी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी साधले. सदर नाट्य स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
वेगळ्या धाटणीतील नाट्यविष्कार
अंतिम फेरीसाठी शनिवारी निवडण्यात आलेल्या दोघेही एकांकिकांचे विषय अतिशय वेगवेगळे होते. त्यापैकी मू. जे. महाविद्यालयाने कंदील ही मराठी (अहिराणी) एकांकिका सादर केली. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीतून जी राख पडते त्या राखेचा येथील नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, यातील अनुभव या एकांकिकेत मांडले आहे. कलावंताचे प्रभावी संवाद व सादरीकरणाद्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तसेच नूतन मराठा महाविद्यालयाच्या संघाने “माय भवानी” हि जळगाव जिल्ह्यातील रथस्तोवा दरम्यान निघत असलेल्या मिरवणुकीतील भवानी मातेचं सोंग घेवून लोकनृत्य करत असलेल्या कलावंतांवर आधारित एकांकिका सादर केली. ग्रामीण समकालिन वास्तव खुबीने मांडलेले हि एकांकिका आजच्या तरुण पिढीची विखंडीत मानसिकता, वर्तमानविभ्रम, आत्मवंचनेतून वाढत जाणारी शरणागत अवस्था विलक्षण संवादातून, घटनांमधून अधोरेखित करते. आपल्या धर्मापलीकडे जात शहरातील संस्कुतीसाठी जीवाचे रान करणार्या समकालिन नायकाची ही कथा जागतिक पातळीवरील वास्तवाच्या विशाल आकाशाला गवसणी घालते.
युवा कलाकारांसाठी वेगळे व्यासपीठ
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच महाविद्यालयीन कलाकारांनी अन्य महाविद्यालयीन एकांकिकांच्या तुलनेत या स्पर्धेच्या वेगळेपणाबद्दल दाद दिली. ‘इतर स्पर्धामधून आम्हाला फारसे पुढे जाण्याची संधी मिळत नाही. पण या स्पर्धेत रायसोनी इस्टीट्युट माध्यम प्रायोजक असल्याने आणि रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रतिनिधी स्पध्रेच्या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या गुणवत्तेची नोंद घेत असल्यामुळे या क्षेत्रात आणखी पुढे जाण्याची संधी या स्पध्रेमुळे मिळेल,’ असा विश्वास नूतन मराठा महाविद्यालयाच्या हनुमान सुरवसेने व्यक्त केला, तर ‘महाविद्यालयीन एकांकिकांच्या दृष्टीने उपलब्ध झालेल्या या वेगळ्या व्यासपीठामुळे युवा नाटय़ चळवळीला गती मिळेल,’ असा आशावाद मुजे महाविद्यालयाचे नाट्य समन्वयक वैभव मावळे यांनी नोंदवला. दोन एकांकिका सादर होण्याच्या मध्यंतराच्या काळात सोनी मराठी टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकार हेमंत पाटील यांनी युवा कलाकारांशी संवाद साधताना, नाटय़ क्षेत्रात अभिनय वगळता इतरही अनेक अंगे आहेत. त्यामध्ये कौशल्य आत्मसात करून या क्षेत्रातील करिअर घडविण्याचा सल्ला दिला.