जळगाव(प्रतिनिधी)- शहरातून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह आज सकाळी मेहरूण तलावात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मयत तरूणाचे नाव सुकदेव धोंडू भंडारे (वय-27, ह.मु.-रामेश्वर कॉलनी, मुळ रहिवाशी सोनखेडे लपाली,ता. मोताळा, जि.बुलढाणा.) असे आहे.
सुकदेव भंडारे तीन मार्चपासून घरातून बेपत्ता होता. त्याचे भाऊ, बहिण आणि मेहुणे यांनी शोधाशोध केली असता, आज 5 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मेहरूण तलावात त्याचा मृतदेह तरंगतांना दिसला. यावेळी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. नंतर काही नागरीकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला कळवले.
यावेळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पीएसआय विशाल सोनवणे, शिवदास चौधरी करीत आहेत.
सुकदेव भंडारे यांचे आई, वडील मयत झाल्यामुळे सुकदेव व त्याचे भाऊ उदरनिर्वाहासाठी आपल्या बहिणीकडे रामेश्वर कॉलनी येथे मागील 15 वर्षापासून आले होते. सुकदेव लोटगाडीवर भाजीपाला विकून उदरनिर्वाह करीत होता. परंतू त्याला दारूचे व्यसन होते,असे त्याच्या भावाने सांगितले. त्याच्या पश्चात एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.