टाकळी येथे दगडफेकीत तरुणाचा मृत्यू तर दोन जखमी
जामनेर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी निकाल लागला. दरम्यान तालुक्यामध्ये टाकळी गावात मतमोजणी झाल्यानंतर दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर झालेल्या तुफान दगडफेकीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. जामनेर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. तालुक्यातील टाकळी गावामध्ये मंगळवारी १० जागांसाठी मतमोजणी झाली. मतमोजणी झाल्यानंतर परिवर्तन पॅनल सात जागांवर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर पॅनलतर्फे जल्लोष सुरू असताना दुपारी १२ वाजेनंतर दोन गटांमध्ये वाद झाले. यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली.
यात धनराज श्रीराम माळी (वय – 34) या तरुणाला दगड वर्मी लागून गंभीर जखमी झाला. त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. यासोबत आणखी दोन ते तीन जणांना दगडफेकीत दगड लागून जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत वातावरण नियंत्रित कार्यवाही सुरू आहे.
तसेच दगडफेक करणाऱ्या तरुणांची धरपकड केली जात आहे.मयत तरुण धनराज माळी यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयांमध्ये एकच आक्रोश केला.