जळगाव ( प्रतिनिधी ) – इच्छादेवी चौकातील विशाल पेट्रोलपंपासमारील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रालाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल आधार नाथ ( वय – ३३ ) रा. सेंधवा हा मध्यप्रदेश मध्यप्रदेशातील रहिवासी असून खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. गोपाल हा खंडेराव नगरातील नातेवाईकांकडे लग्नासाठी गुरूवारी १ डिसेंबर रोजी सकाळी मध्यप्रदेशातून जळगावात आलेला होता. नातेवाईकांकडील लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री ११ वाजता रामेश्वर कॉलनीत दुसऱ्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. शहरातील इच्छादेवी चौकातच्या पुढे असलेल्या विशाल पेट्रोल पंपाजवळून रामेश्वर कॉलनीत जात असतांना भुसावळकडून धुळ्याकडे जाणारा अज्ञात ट्रालाने गोपालच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गोपालचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी घटनास्थळी जावून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.