नगर (वृत्तासंस्था) – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड, खरबूज याची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनमुळे अक्षरशः हा शेतीमाल मातीमोल किमतीने व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिंदोडी, निमोणे, मोटेवाडी येथील द्राक्षबागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. प्रतिएकरी 4 ते 5 लाख रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे.
नाशिकच्या धर्तीवर शिंदोडी, निमोणे, मोटेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यासाठी जमिनीची मशागत करून जमीन तयार करणे, त्यानंतर द्राक्ष लावण्यासाठी जमिनीत लोखंडी ऍगल उभे करणे आदी कामांसाठी एकरी 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो. सुरूवातीला द्राक्ष लावल्यानंतर पीक हातात येईपर्यंत सुमारे 2 वर्षाचा कालावधी जातो. त्यानंतर द्राक्षाचे उत्पन्न सुरू होते. पण जर या 2 वर्षांत काही नैसर्गिक आपत्ती आली तर द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सोसावा लागणार आहे.
शिंदोडी येथील शहाजी वाळुंज आणि रोहित वाळुंज या शेतकऱ्यांनी द्राक्षाचा सुपर सोनाका जातीचा वाण लावले आहे. द्राक्षाच्या दोन वेलातले अंतर 8 बाय 5 असे ठेवले आहे. एकरी 10 ट्रॉल्या शेणखत टाकले आहे. अंदाजे द्राक्षाचे प्रति एकरी 14 ते 15 टन उत्पन्न निघते. दरवर्षी 40 ते 50 रुपये प्रतिकिलो बाजारभाव असतो. त्यामुळे 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळते. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या मातीमोल किंमतीने द्राक्ष विकावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान कसे भरून काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
60 एकर बागायतदार चिंताग्रस्त
शिरूर तालुक्यात सुमारे 60 एकर द्राक्षबागा आहेत. यात निमोणे, शिंदोडी, मोटेवाडी, पाबळ, हिरवे कुंभार आदी गावांत द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. एक मार्च रोजी द्राक्ष विक्रीस सुरूवात झाली. मात्र, विक्रीत गती पकडत असताना करोनाचे वादळ 15 मार्चपासून घोंगावू लागले.
त्यात 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्ष उत्पादक घायकुतीला आला आहे. मागील वर्षी प्रति किलो 70 ते 80 रुपये भाव मिळत होता. आता यावर्षी या द्राक्षांना 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निम्म्याने घाटा झाला आहे. कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ आली असल्यामुळे उत्पादन खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी शेतकरी आता मेटाकुटीला आहे.