चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात व्याजाचे पैसे परत दिले नाही या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांवर चॉपरे वार करून जखमी करत जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव पोलिसांकडून मिळालेली माहितीवरून, हर्षल दीपक राठोड (वय-१६) रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव याने श्याम उर्फ सॅम चव्हाण यांच्याकडून उधारीचे पैसे घेतले होते. यामध्ये त्यांच्या वाद झाला, त्यावरून नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या रागातून हर्षल दीपक राठोड आणि त्याचा मित्र अंकित महेंद्र मोरे (वय-१५) रा. हनुमान वाडी, चाळीसगाव यांना रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील सेंट्रल बँकेसमोर सुमित उर्फ बाबा अशोक भोसले, संतोष उर्फ संता पहिलवान, रमेश निकुंभ, श्याम उर्फ चव्हाण, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे, सर्व रा. हिरापूर ता.चाळीसगाव, सचिन सोमनाथ गायकवाड, अमोल गायकवाड, कृष्णा गायकवाड रा. चाळीसगाव आणि विकी पावले यांच्यासह इतरांनी अंकित व हर्षल या दोघांना बेदम मारहाण करत लाकडी दांडका, चॉपर आणि खिळ्यांच्या फळ्याने बेदम मारहाण करून डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत केली. या संदर्भात सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता महेंद्र भगवान मोरे यांच्या फिर्यादीवरून वरील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.