जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील किराणा दुकान फोडून ९० हजारांची रक्कम चोरल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला रविवार, १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
जळगाव शहरातील शिवाजी नगर येथे आनंद मदनलाल नागला यांचे किराणा दुकान आहे. या किराणा दुकानात चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातुन ९० हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना २ जुलै २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवाजीनगरातील किराणा दुकानात चोरी ही गेंदालाल मिल येथील फिरोज शहा (वय २०) याने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील यांच्या पथकाला फिरोज यास अटक करण्याच्या सुचना केल्या होत्या. चार महिन्यांपासून फरार असलेला फिरोज हा रविवारी रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने रेल्वे स्टेशन मागील परिसरातून पूलाखालून फिरोज यास अटक केली. त्याला पुढील कारवाई करीता शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.