जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा व जी. टी. पाटील महाविद्यालयाचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम याला नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार २४ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता वितरित होणार आहे.
प्रतीक कदम याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण, रक्तदान अभियान, डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान, जनधन योजना आदी बाबतीत भरीव काम केले. सोबतच २०२० -२१ मध्ये दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या वतीने कॉन्टिजंट कमांडर म्हणून नेतृत्व केले होते तर दिल्ली येथेच संपन्न झालेल्या युवा सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राची लावणी व बासरी वादन करून सांस्कृतिक प्रतिनिधित्व केले होते. दोन वर्षाच्या कालावधीत प्रतीक कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागातून आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता उत्कर्ष सारख्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या विविध शिबिरांमध्ये सहभाग नोंदविला होता. कोविड काळात प्रतिक कदम याने स्वतः पाचशेपेक्षा अधिक मास घेऊन मजूर व दत्तक वस्तीत वाटप केले होते. तर, नंदुरबार सारख्या ग्रामीण आदिवासी जिल्ह्यातील नागरिक लसीकरण करण्यासाठी येते नव्हते तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांचे सहकार्य घेऊन गावा गावात,वस्ती पाड्यावर जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. याच काळात २००० पेक्षा अधिक सापांना जीवदान देऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम केले होते, सर्पमित्र म्हणून प्रतीक कदम पूर्ण खान्देशात परिचित आहे.
या संपूर्ण कार्याची दखल घेऊन प्रतीक कदम या विद्यार्थ्याला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रतिकचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यापीठाच्या मानात एक मानाचा तुरा रोवला. त्याबद्दल प्रतिकचे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले, राष्ट्रीय सेवा योजनेचे तत्कालीन संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, विद्यमान संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्यासह विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कर्मचारी बांधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. एम.जे.रघुवंशी कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल भुयार व त्यांचे सर्व टीम यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.