नाशिक (वृत्तासनस्था) – विविध राज्यांत अकडलेल्या कामगारांना आता आपापल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज जवळपास साडे आठशे कामगारांना घेऊन नाशिकहून लखनऊला विशेष ट्रेन रवाना झाली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी ट्रेनला हिरवा कंदील दाखवला.
नियोजित ट्रेन कालच नाशिकहून रवाना होणार होती. मात्र काही कारणास्तव उत्तरप्रदेश सरकारकडून मनाई करण्यात आल्याने काल ही ट्रेन स्थगित करुन आज रवाना करण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकावरील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तसंच भारत माता की जय घोषणा देत त्यांना निरोप दिला.
लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक लवकरच स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून ‘श्रमिक विशेष’ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात कामगारांना आपल्या घरी जाण्याकरिता पहिली ट्रेन धावली. तेलंगणाहून झारखंडला ही पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली.