जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नॅक पूनर्मूल्यांकनात प्राप्त झालेली “अ” श्रेणी ही सांघिक भावनेमुळे प्राप्त झालेली असून विद्यापीठाच्या सर्व भागधारकांना ही श्रेणी समर्पित करीत असल्याची भावना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाला नॅक पूनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत ३.०९ सीजीपीए सह “अ” श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक दिनाचे औचित्य साधून कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी सोमवारी पदवीप्रदान सभागृहात शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी- कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी, दैनिक वेतनिक, साफसफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्याशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात बोलतांना प्रा.माहेश्वरी म्हणाले की, विद्यार्थी, पालक, तिनही जिल्ह्यातील नागरिक, भागधारक यांच्यासह सर्व घटकांना ही श्रेणी समर्पित करीत आहे. पुढच्या पाच वर्षात शैक्षणिक विकास निश्चितच उंचावून “ए प्लस” श्रेणी प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळेच्या नॅक पूनर्मूल्यांकनात काही आव्हाने होती. त्यामध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेली, नॅकची मूल्यांकनाची निकषे बदलली. स्वयंमूल्यांकन अहवालाच्या नमून्यात तीन वेळा बदल झाला. अशा अडचणीतून मार्ग काढत नॅकला आपण सामोरे गेलो आणि “अ” श्रेणी प्राप्त झाली. ही श्रेणी म्हणजे विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या सांघिक भावनेचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक घटकाचे यामध्ये योगदान असल्याचा उल्लेख कुलगुरुंनी केला.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रा.पी.पी. माहूलीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कर्मचाऱ्यांमधून अतुल पाटील, वैशाली शर्मा, शिक्षकांमधून प्रा.मनीष जोशी व प्रा. मधुलिका सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे सचिव प्रा.समीर नारखेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.