नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अनेक कामगार, विद्यार्थी देशाच्या विविध भागात अडकले असल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अडकलेल्यांना स्वगृही जाण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यानुसार आज सकाळी पहिली ट्रेन धावली.
अडकलेल्या लोकांना स्वगृही पाठवण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसारच पहाटे ५ च्या सुमारात तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली. २४ डब्ब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ १२०० लोकांना आपल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. तर, ट्रेनमधील प्रवाश्यांना क्वारंटाइन पाळण्याची सक्ती करण्यात आली होती. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अडकलेल्या कामगारांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती.
दरम्यान, ट्रेन सुरू करण्यात आली असली तरी इतर राज्यांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पायलट प्रोजेक्ट तत्वावर ही पहिली ट्रेन सोडण्यात आली.