मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील साकीनाका येथे भयानक परिस्थीतीत मृतदेह आढळून आला पोलिसांनी एका खोलीची पाहणी केल्यानंतर ही घटना समोर आली आहे.
पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हा खून झाकण्यासाठी पत्नीने थेट खोली भाड्याने घेऊन कपाटात पतीचा मृतदेह ठेवला होता.
मुंबईतील साकि नाका येथे राहणाऱ्या या दाम्पत्याचे वारंवार संशयावरून भांडण व्हायचे. पती सारखे भांडण करतो म्हणून पत्निला त्रास व्हायचा या रागातून तिने थेट पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कोणालाही खबर न लागता तिने जवळच एक खोली भाड्याने घेऊन पतीचा खून करत मृतदेह कपाटात लपवून ठेवला.
मृतदेह अनेक दिवस ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागली आणि शेजाऱ्यांनी तक्रार केली आणि त्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला. साकीनाका पोलिसांनी पतीची हत्या करणारी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. मुंबईतील साकीनाका येथील यादवनगरमध्ये नसीम शेख आणि रुबिना शेख हे पती-पत्नी राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एका भाड्याने घेतलेल्या खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने येथील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली होती या तक्रावरून पोलिसांनी कुलूप तोडून घर उघडले असता कपाटामध्ये कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला.
आजुबाजूच्या रहिवाशांनी हा मृतदेह नसीम शेख याचाच असल्याचे सांगितले. ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य़क निरीक्षक धीरज गवारे, अर्जुन कुदळे, वाल्मिक कोरे यांच्यासह लोणकर, चव्हाण, बनसोडे यांची पथके तयार करण्यात आली. तपासदरम्यान नसीम यांची पत्नी गायब असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी रुबिना हिला शोधून काढले.
नसीम घरी एकटाच असताना मित्र सैफ फारुकी याच्या मदतीने गळा दाबून मारल्याचे ती म्हणाली . पोलिसांनी सैफ यालाही अटक केली. नसीम चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याने त्याची हत्या केल्याचे रुबिना म्हणाली. दोघांनी नसीमचा मृतदेह लपविण्यासाठी खोली भाड्याने घेतली. तेथून मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती; मात्र ती संधी मिळाली नाही आणि दुर्गंधी सुटल्याने गुन्हा उघडकीस आला.