पाचोरा ( प्रतिनिधी ) – पुण्याहून पाचोरा येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी साडेसहा वाजता पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील रहिवासी ह.मु. स्वामी लॉन्सजवळ, भडगाव रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनिता सुरेश पाटील हे वास्तव्याला आहे. चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जेठाण्यांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम गेल्या होत्या. दरम्यान ओटी भरण्याचा कार्यक्रम आटोपून १६ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदियाकडे जाणाऱ्या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रंमाक ११०३९) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान रविवारी १७ जुलै रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जेठाण्या व सुनिता पाटील ह्या प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्रॉस करुन जात असतांना तीन जावा ह्या दुसऱ्या साईडच्या अपसाईडच्या प्लॅटफार्म वर चढल्या. दरम्यान सुनिता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (क्रंमाक २२२२२) ही भरधाव वेगाने येत असल्याचे सुनिता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची धडपड उडाली. राजधानी एक्सप्रेसच्या लोकोपायलट ने जोरात हॉर्न वाजवुन तसेच गाडी हळु करण्यासाठी ब्रेक देखील दाबला मात्र राजधानी एक्सप्रेस सुसाट वेगाने असल्याने लोकोपायलट यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला. नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. क्षणाताच सुनिता पाटील ह्या राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत सुनिता सुरेश पाटील यांच्या पाश्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.