जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राज्यात झालेल्या नवीन सत्तांतरात पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याची धुरा येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यासह चर्चेत असलेले महसूलमंत्रीपद देखील गिरीशभाऊंकडे जाणार असल्याबाबत शक्यता भाजप गोटातून व्यक्त केली जात आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी हा १० जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांचा समावेश निश्चित असून त्यांच्याकडे मागील वेळेस असलेले वैद्यकीय शिक्षण व संशोधन खाते पूर्ववत मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच जलसंपदा खाते देखील त्यावेळी गिरीश महाजन यांच्याकडे होते. मात्र या खात्यासाठी शिंदे गटातून उदय सामंत इच्छुक असल्याची माहिती आहे. महसूलमंत्रीपदासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राम शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासह शिंदेगटातील दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांची नावे चर्चेला आहेत. मात्र हि सर्व नावे मागे पडून महसूलमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्याविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे.