आज नोटिसा मिळण्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) :- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंड केलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा देण्याबाबत निर्णय घेतला असून त्यांना आज नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
शिवसेना पक्षाच्या विरोधात कारवाया केल्या तसेच बैठकीला हजर झाले नाहीत म्हणून १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी पत्रकारांना दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे आणि एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आ.चिमणराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील राजकीय घडामोडीमध्ये जळगाव जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य नेमका आता काय होतंय याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक बहुतांशी संख्येने उद्धव ठाकरे यांना समर्थन देताना दिसून येत आहे. त्यामुळे पलायन केलेल्या सर्व आमदारांच्या विरोधात आता शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरत आहे.