जळगाव ( प्रतिनिधी ) – समता नगरातील राहणाऱ्या ३८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन मनोरंजन सोनवणे (वय ३८, रा. समतानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. चेतन सोनवणे हा पत्नी, दोन मुलांसह समतानगरात वास्तव्याला होता. हातमजुरी आणि मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, मेहुणीचे लग्न असल्यामुळे त्याची पत्नी व मुले गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी गेलेले होते. सोमवारी त्या घरी येणार होत्या. तत्पूर्वी घरी एकटाच असलेल्या चेतनने शनिवारी ४ जून रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी ५ जून रोजी सकाळी सहा वाजता नळांना पाणी आल्याने त्याचा चेतनचा भाऊ चेतनला झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. तेव्हा भावाने गळफास घेतल्याचे उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.