मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात काल त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं आहे.
गेल्या 2 वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तिथून ते बरे होऊन मायदेशात परतेल होते. मात्र त्यांना दरम्यानच्या काळात परत त्रास होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे ते बैचेन होते.
बॉबी, चांदणी, नगीना, दिवाना, प्रेमरोग, अमर अकबर अँथोनी अशा एक ना अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये त्यांनी अत्यंत छोटं पण महत्त्वपूर्ण काम केलं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कलाकार व्यक्त करत आहेत.
चित्रपट सृष्टीला गेल्या 24 तासांत दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांना जाऊन आणखी 24 तास देखील झाले नाहीत तोपर्यंतच ऋषी कपूर गेल्याची बातमी आली आहे. याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळते आहेत.