साधारण कर्तव्ये व कामगिरीचाच उल्लेखनीय कामे म्हणून उदो उदो !
जळगाव ( प्रतिनिधी) – न झालेल्या बढतीसह बदलीचा गवगवा करीत लॉकडाउनचे उल्लंघन करीत चेल्यांकडून विविध ठिकाणी जाहीर सत्कार घडवून आणल्याने गोची झालेले यावलचे पो.नि. अरूण धनवडे आता सोशल मीडियावर बचावासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. या धडपडीत त्यांनी आपण कसे अत्यंत कर्तव्यनिष्ठ व न्यायी असल्याचे पाढे वाचलेले आहेत. त्यातून पुन्हा त्यांचीच केविलवाणी मानसिकता त्यांनी दाखवून दिलेली आहे . कारण, एका पोलिस निरीक्षकाची जी साधारण कर्तव्ये व कामगिरी असते तिचाच पो.नि. अरूण धनवडे उल्लेखनीय कामे म्हणून उदो उदो करीत आहेत.
पो.नि. धनवडे यांनी सोशल मीडियावर 14 मुद्दे मांडून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे हे मुद्दे त्यांच्याच शब्दांत …
1) 1 जानेवारी ला मी पोलीस निरीक्षक म्हणून प्रथमच यावल पोलीस ठाणेचा प्रभार स्विकारला व पहिल्याच मुलाखतीत शिस्तीला महत्व देऊन पोलीसांबद्दल जनतेत *आदरयुक्त भिती* निर्माण करणार, असे बोललो होतो आणि केवळ 3 महिन्यांत एकट्याने ते करून दाखवले आहे.
2) ओळख नका सांगू, काम सांगा, तसेच ठाणे अंमलदार यांचेकडून आपले समाधान न झाल्यास पोलीस निरीक्षक यांना भेटावे फोन नं.9821665693 असे जाहीर फलक लावून सर्वसामान्याला न्याय दिला.
3) दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी एकट्याने परिक्षा केंद्र चोख बंदोबस्त केला. त्यावेळी तरुणाईला लाजवेल असे वयाच्या 46 व्या वर्षी शारीरिक तंदुरूस्ती दाखवून दिली.
4) एकट्याने पुढे होऊन, दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या व दारू बनविणारे आणि विकणारे यांना गजाआड केले. आतापर्यंत कोणी केली का हिंमत ?
5) कित्येक वर्षे अंजाळे घाटात वाहनचालकांना लुटमार करणारे दरोडेखोरांचा कायमचा बंदोबस्त केला.
6) पोलीसांच्या कोठडीतून पळालेल्या फरार मुबारक तडवी, रा.परसाडे, वड्री याचा जंगलात थरारक पाठलाग करून पकडले.
7) कोरोना या महारोगाबाबत वेळेचे भान न ठेवता स्वतः कधी पायी तर कधी गाडी चालवत मंदिर, मस्जिद येथील लाऊड स्पीकर व झजड व्दारे गावोगावी फिरून जनजागृती केली.
8) तडजोड न करता येईल तो गुन्हा दाखल केल्याने मध्यस्थांचे कामधंदे बंद केले.
9) डांभुर्णी प्रकरणात गुन्हा नं.59/20 मध्ये आरोपीला 24 तासात अटक करून दाखवले,
गुन्हा नं.60,61आणि 62 हे गुन्हे काहीही कारण नसताना डांभुर्णी गावातील विशिष्ट जातीच्या जमावाने आपला गावावर व पोलीसांवर प्रभाव दाखविण्यासाठी केलेले गैरकायदेशीर कृत्य होते.
10) गुन्हा नं. 62 हा माझेकडे तपासास आहे, परंतु त्यात मनोज नेवे यांचे नाव नसल्याने त्यांना मी अटक केलेले नाही. मग मला उगीच बदनाम केले जात आहे.
11) गुन्हा नं. 61 मध्ये मनोज नेवे यांचे नाव असल्याने, त्यात नमुद गुन्ह्याचे तपासी अधिकारी पी.एस.आय. कोळपकर यांनी अटक केले आहे. मनोज नेवे यांचे अटकेशी माझा काही संबंध नाही, फक्त मी तपासी अधिकारी यांना योग्य ते कायदेशीर सहाय्य केले आहे. मनोज नेवे नावाची एकच व्यक्ती डांभुर्णी गावात होती व आम्ही 19 दिवस शोधून देखील ते सापडत नव्हते. ते पत्रकार आहेत असे सांगताच त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक दिली आहे. घटनेसमोर सगळे समान असल्याने त्यांना अटक करणे अपरिहार्य होते. आमची बाजू ऐकून न घेता आम्हावर खोटे आरोप करण्यात आले.
12) माझा कोणताही पंटर नाही. असल्यास नावे जाहीर करावीत.
13) मी दररोज सकाळी 4:30 वा. उठून 07:00 वा. पर्यंत 8-10 कि.मी. मॉर्नींग वॉक करतो व शरीर आणि मन सुदृढ ठेवतो. मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून मी यावल हद्दीतील ब-याच खेड्यांना 15-20 कि.मी. पायी चालत जाऊन भेटी देऊन जनसंपर्क वाढविला आहे. माझी कामे जनतेच्या नजरेत आहेत.!
14) गावोगावच्या पोलीस पाटील यांना पाठींबा देऊन गाव पातळीवर त्यांना कामात मदत केली आहे, त्यामुळे माझ्या एकाच सुचनेवर सर्व पोलीस पाटील गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत. पोलीस पाटील यांचेशी माझे चांगले संबंध निर्माण झाल्याने कोरोना या महामारी विरोधात लढण्याचे बळ मला प्राप्त झाले आहे.
आता पो.नि. धनवडे यांची ही केविलवाणी धडपड उघडीे पाडणारे प्रतिप्रश्न लोकांकडून विचारले जाऊ लागले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपरोक्त 4 क्रमांकाच्या मुद्यानुसार दारूच्या हातभट्टया बंद करताना त्यांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केली? व त्या आरोपींवर काय कारवाई झाली? , हे धनवडे यांनी छातीठोकपणे सांगावे. हातभट्टी दारूच्या गुन्ह्यांती काही आरोपी पोलिस दप्तरी फरार दिसत आहेत. हे आरोपी पोलिसांनीच फरार केले असल्याची खिल्ली उडविली जाते आहे.
सध्या संपूर्ण तालुका ढवळून काढत असलेल्या पत्रकार मनोज नेवे यांच्या अटकेच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, 24 एप्रिलला रात्री साडेेबारा वाजेच्या वेळेत पोलिसांनी अटक केली होती त्यावेळी स्वत: पो. नि. अरूण धनवडे यांच्यासह गोपनीय शाखेचे कर्मचारी नेवे यांच्या घरी गेलेले होते. त्यांच्या पत्नी अर्चना नेवे यांनी पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला होता की त्यांचे पती नेहमी पोलिसांना सहकार्य करीत असतानाही आज त्यांना असे सराईत गुन्हेगारासारखे का पकडून नेत आहात? त्यावर धनवडे यांनी अर्चना नेवे यांना तुम्ही वकील बनण्याचा प्रयत्न करू नका , फिर्यादीत त्यांचे नाव असल्याने त्यांना अटक करावीच लागते आहे. तुम्ही त्यांचे आधारकार्ड व पासपोर्ट फोटो पोलिसांना दुसर्या दिवशी द्या त्यानंतर त्यांना सोडून देण्याबद्दल आम्ही सांगू, अशी स्वत:च जणू न्यायतत्वाचे तारणहार असल्यासारखी भाषा वापरली होती. अटकेच्या कारवाईच्यावेळीही पोलिसांनी पत्रकार मनोज नेवे यांचे काहीच ऐकून घेतले नव्हते. तरीही आता पो. नि. अरूण धनवडे म्हणत आहेत की, पत्रकार मनोज नेवे यांना मी अटक केलेली नाही , मला उगीच बदनाम केले जाते आहे. पो. उ. नि. कोळपकर यांनी नेवे यांना अटक केली होती. मी फक्त त्यांना मदत केली. असे असले तरी कोळपकर यांचा अटकेच्या कारवाईचा निर्णय चुकीचा ठरू शकतो याचा अंदाज वरिष्ंठ म्हणून पो. नि. अरूण धनवडे यांना कसा आला नाही?, असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यामुळे असा झापडबंद कारभार नेमका कुणाचा ?, कोळपकरांचा की धनवडेंचा? , हा नवा प्रश्न पुढे आला आहे. आता आम्ही कायद्याने बांधील आहोत. आमची मीडिया ट्रायल कुणी घेऊ नये असेही ते म्हणू शकतात पण सामान्य माणसालाही गोंधळात टाकणारी धनवडे यांची चालबाजीची भूमिका आता जास्त काळ ते जगापासून लपवून ठेऊ शकणार नाहीत, हे मात्र नक्की.
पो. नि. धनवडे यांनी ठरवून चेल्यांना कामाला लावून त्यांचे जे सत्कार घडवून आणले व त्यांची बदली होऊ नये म्हणून जो जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात जमा केला व जवळपास 20 अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरही आक्षेप घेतला जातो आहे. त्यावेळी जमलेल्या जमावात जवळपास 200 लोक होते असा उल्लेख बातम्यांमध्ये आहे व त्या घटनांच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओंमध्येही तो जवळपास 200 लोकांचा जमाव दिसतो आहे. मग फक्त 20 अज्ञात लोकांवरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी का घेतली ? त्यांचा गुन्ह्यात अज्ञात असा उल्लेख करून पोलिस कुणाला अभय देत आहेत? त्या जमावातील कुणालाच पोलिस ओळखत नसतील असे कसे होऊ शकते? त्याचप्रमाणे ज्या 20 लोकांवर गुन्हा दाखल झाला ते वगळले तर उर्वरित 180 लोक तेथे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या परवानगीने आले होते का? असा सवाल आता सामान्यांमधूनही विचारला जाऊ लागला आहे.