जळगाव ( प्रतिनिधी ) – आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी’ च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वीकृत संचालकांची निवड जाहिर करण्यात आली.स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांचीही निवड झाली आहे.
‘ग. स. सोसायटीच्या अधिनियमानुसार दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत स्वीकृत संचालक’ म्हणून महापौर जयश्री महाजन यांची निवड जाहीर करण्यात आली.
मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते राम पवार यांची निवड आधीच जाहीर झाली होती. आजच्या सभेत महापौर जयश्री महाजन यांच्यासमवेत दोन्ही स्वीकृत संचालकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष उदय मधुकर पाटील, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील, महेश पाटील, .भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, रागिणी चव्हाण, वाल्मिक पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित होते. याप्रसंगी महापौर.जयश्री महाजन यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.