पारोळा ( प्रतिनिधी ) – आत्मसंयम शिकण्याची, स्वतःचे परीक्षण करण्याची संधी अल्लाह आपल्याला देतो, अडचणीच्या सामना करण्याची ताकद, चुकीच्या प्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवण्याची क्षमता माणसांमध्ये निर्माण होण्याची प्रेरणा रमजान, नवरात्रीच्या माध्यमांतून मिळत असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी येथे व्यक्त केले.
शनिवारी सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी आंबेडकर चौक ( पारोळा ) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत श्री मुंढे पुढे म्हणाले, सोशियल मीडियातील चुकीचे मॅसेजवर विश्वास ठेवू नका चुकीच्या पोस्टना पुढे न पाठवता डिलीट करा आणि पोलिसांत तक्रार करा. तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल असे आश्वासन देत समस्त समाज बांधवांना त्यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात 200- पोलीस मित्र यांना टि- शर्ट, लाठी, आयकार्ड व शिट्ट्या वाटप करण्यात आल्या. या इफ्तार पार्टीचे अध्यक्षस्थानी आ.चिमणराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, तहसीलदार अनिल गंवादे पो नि रामदास वाकोडे, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, शहर तलाठी निशिकांत माने, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोडे, उपनगराध्यक्ष-दीपक अनुष्ठान, नगरसेवक कैलास चौधरी , भैया चौधरी, सलीम कुरेशी, मोहम्मद मास्तर, अजित मंसुरी, शेख जुबेर, महिला दक्षता समितीच्या अँड कृतिका अफ्रे, गायत्री महाजन, सुवर्णा पाटील, अँड स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जे बी पाटील यांनी केले तर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी आभार व्यक्त केले.