पालघर (वृत्तसंस्था) – पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दितील गडचिंचले गावात दोन साधू व त्यांच्या चालकाची जमावाकडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गडचिंचले गावासह आजूबाजूच्या पाडा व गावातील 400 ते 500 लोकांचा जमाव असल्याचे सांगितले जात असून, घटनेच्या दुसऱ्या दिवशीच 110 जणांना अटक करण्यात आली होती. यात 9 जण अल्पवयीन आहेत. यानंतर कासा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एका पोलीस उप निरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आले होते. यानंतर कासा पोलीस स्टेशनच्या 35 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या, पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी केल्या आहेत. दरम्यान इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस दल ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत.