जळगाव (प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील रेंभोटाच्या महिलेचा भाच्यासोबत दुचाकीने मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या मामीचा भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता.
रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे राहणाऱ्या कविता मुकेश कोळी (वय – ३०) या पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातच त्यांचा भाचा अजय कमलाकर सोनवणे राहतो. त्यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी अजय आणि त्याची मामी कवीता कोळी ह्या एकाच दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे जाण्यासाठी निघाले. जळगाव शहराच्या पुढे द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून गुरूवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जात असतांना मागून येणारा ट्रक (एमएच २९ एम ०१४४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत कविता कोळी ह्या रस्त्यावर पडताच त्यांच्या अंगावरून मागून येणारा ट्रक गेल्याने ते चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय सोनवणे हा जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी, बापू कोळी, प्रशांत पाटील यांनी धाव घेवून जखमीस तातडीने उपचारासाठी रवाना केले तर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीसांना ट्रक ताब्यात घेतला आहे. तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.