जळगाव ( प्रतिनिधी ) – कापणी सुरु असतानाच शॉर्टसर्किटमुळे आग लागून केळीची बाग उध्वस्त झाली यावल तालुक्यातील साकळी शिवारात शेतकरी महेश पाटील यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे आग लागली त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे.
सध्या उन्हामुळे मागणी वाढली त्यामुळे दरातही वाढ झाली याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिक नुकसानच या घटनेत झाले आहे.
साकळी शिवारात महेश पांडूरंग पाटील यांनी 7 हजार 500 केळीच्या खोडाची लागवड केली होती. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जोपासल्यानंतर आता कुठे कारणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. हे सर्व सुरु असतानाच अचानक केळीच्या बागेला आग लागली पाईपलाईन आणि ठिबकच्या नळ्याही जळून खाक झाल्या आहेत.
विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या दुर्घटनेत त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे पाटील यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.