अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मांडळ माध्यमिक शाळेतील गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवारी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना बांगड्या अन साडी चोळीचा आहेर देवून जिल्हा परिषदेच्या कारभाराचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक योगेश साळुंखे, मुख्याध्यापक यांचेसह संस्थाचालक यांनी शासनाची दिशाभूल करीत आर्थिक फसवणूक केली . चौकशीच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना २८ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही वंचित बहुजन आघाडीकडून सोमवारी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबद्दल शिक्षणाधिकारी यांना बांगड्या आणि साडी चोळीचा आहेर देऊन आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.चौकशी समिती नेमून संबधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिले