जळगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव मोटारसायकलने पायी जाणाऱ्या मजुराला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव श्रावण सोळंके वय ४३ असे मयत मजुराचे नाव आहे.
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव सोळंके (वय – ४३) हे मजुरी करुन उदरनिर्वाह भागवित होते. ९ एप्रिल रोजी ते विदगाव – कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या मोटारसायकलने धडक दिली होती. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारसायकलस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता.
मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच बादल व सौरभ ही दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा बादल सोळंके ( वय १९ ) याने दिलेल्या तक्रारीवरुन २५ एप्रिलरोजी मोटारसायकलस्वार सचिन दिनकर सावळे ( चुंचाळे ता. यावल ) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणीक सपकाळे हे करीत आहेत.