पाचोरा ( प्रतिनिधी ) – केंद्रीय क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय 18 वर्षाआतील वयोगटाची राष्ट्रीय अजिंक्य बुद्धिबळ निवड स्पर्धेत जळगावची भाग्यश्री पाटील प्रथम आली आहे .
तामिळनाडूमधील कोईमतुर पोलाची येथे डॉ महालिंगम इंजिनीरिंग कॉलेज येथे फिडे अंतर्गत ऑल इंडिया फेडरेशन व तामिळनाडू स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18 वयोगटातील मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद निवड बुद्धिबळ स्पर्धेत एम एम कॉलेज ( पाचोरा ) ची विद्यार्थीनी व परिवर्तन जळगावची भाग्यश्री पाटील हिने अकरा फेऱ्यामध्ये अपराजित राहत 9 विजय व दोन बरोबरी करत दहा गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे . या स्पर्धेत तिला कोणीही पराभूत करू शकल नाही 11 फेऱ्या असलेल्या या खेळात 9 व्या फेरीतच तिचे अजिंक्यपद नक्की झाले होते .
पहिल्या तीन विजेत्या भारत सरकारकडून एशियन टूर्नामेंट व जागतिक अठरा वयोगटाच्या मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील . या अगोदर भाग्यश्री सात वयोगटात भारतात पहिला आली होती . 10 वयोगटात तीने जगात तिसरा क्रमांक मिळवला होता . सोळा वयोगटात भारतात पहिली आली व जागतिक स्पर्धेत आठवा क्रमांक मिळवला होता . 19 वयोगटातील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आहे . एशियन टूर्नामेंट व वर्ल्ड टूर्नामेंट व परदेशातील नामांकन बुद्धिबळ स्पर्धा भारताकडून खेळणार आहे . भारतात तिला विदेशी ग्रँड मास्टरकडून प्रशिक्षण मिळणार आहे . तिने कॉमन वेल्थ व एशियन स्पर्धेमध्ये भारताला आतापर्यंत 16 आंतरराष्ट्रीय मेडल मिळवून दिले आहेत .
तिच्या या यशाने जळगाव व पाचोरासारख्या छोट्या गावात राहणारी मुलगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला सिद्ध करू शकते हे भाग्यश्रीने दाखवले आहे . पिटीसी परिवाराला भाग्यश्रीच्या यशाचा आनंद आहे . महाराष्ट्रभर आपल्या सांस्कृतिक कार्याने परिचित परिवर्तनला भाग्यश्रीने एक नवा आयाम दिला आहे . राज्य बुद्धीबळ संघटनेचे अशोक जैन , पाचोरा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघ तसेच पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दुष्यंत रावल , सचिव एन आर ठाकरे यांनी तिचे अभिनंदन केले.