जळगाव (प्रतिनिधी) – जैन धर्माचे आधारभूत तत्व अहिंसा आहे. भगवान महावीर जन्मकल्याणाचे औचित्य साधून नूतन भावना मंडळ व नवजीवन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी रसोई मेरा विवेक’ या निबंध स्पर्धेचा निकाल मंगळवारी (दि.१९) रोजी जाहीर करण्यात येऊन पारितोषिक वितरणही संपन्न झाले.
जैन धर्मीय महिला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घरातील स्वयंपाकघरात अहिंसातत्वाचे कसे पालन करतात हा विषय देऊन या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेरिता हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषेतून आलेल्या निबंधांमधून प्रथम पारितोषिक सौ.आर्मिका पलाश दुग्गड, द्वितीय पारितोषिक सौ.भाग्यश्री दिलीप कुमट, तृतीय पारितोषिक सौ.भावना दिनेश लोढाया तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ.चेतना सचिन बाफणा यांना जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवजीवन प्लसच्या सौ.कांचन अनिल कांकरिया व नूतन भावना मंडळाच्या अध्यक्षा अल्पा नागडा यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सौ.अपूर्वा राका यांनी काम पाहिले होते.