पुणे;- पुणे शहर जिल्ह्यात मंगळवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. पुणे शहर जिल्ह्यात १४३ जणांना लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यात एकट्या पुणे शहरात १३० जणांना, तर पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने १० जणांना लागण झाली. त्याशिवाय ग्रामीण भागातही रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १४९१ इतकी झाली असून पुण्यात कोरोनाची साथीची स्थिती चिंताजनक झाली आहे. दरम्यान, पुण्यात मंगळवारी दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ८६ पर्यंत पोहोचली आहे.
पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध सरकारी आणि खासगी अशा १९ रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रयोगशाळांमध्ये पाठविलेल्या नमुन्यांची माहिती संकलित करणे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा; तसेच विलगीकरण कक्षात सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार विविध समिती स्थापन करण्यात आल्या असून, त्यावर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून त्यांच्याकडे या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या नेमणुका केल्या आहेत.