भोपाळ ( वृत्तसंस्था ) – नागाला मारल्यानंतर नागिणीने बदला घेतल्याचे अनेक चित्रपट तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. असं म्हटलं जातं की, नागिण नागाची हत्या करणाऱ्या आरोपीचं चित्र डोळ्यात बसवते आणि संधी साधून त्याचा जीव घेते. मध्य प्रदेशातील सीहोरच्या बुधनीमध्ये अशीच काहीशी घटना समोर आली आहे. या घटनेची अशाच अर्थाने चर्चा आहे.
बदल्याच्या भावनेने नागिणीने नागाला मारणाऱ्या तरुणाला दंश करून त्याची हत्या केली. बुधनी तहसीलच्या अंतर्गत जोशीपूरमध्ये हा तरुण कुटुंबासोबत राहतो. तेथे चैत्र नवरात्रीत पूजा सुरू आहे.
गुरुवारी घराजवळ त्याला एक साप दिसला होता. नागाला किशोरी लाल आणि त्याच्या कुटुंबाने मारून फेकून दिलं आणि पुन्हा पूजा करू लागले. घटनेच्या 24 तासाच्या आत रात्री 2 वाजता एक दुसरा साप घरात घुसला आणि मुलगा रोहितला दंश केला.
रोहितचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय जागे झाले आणि तातडीने रोहितला होशंगाबादमधील जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला भोपाळला रेफर केलं. रस्त्यातच रोहितचा मृत्यू झाला.