जळगाव ( प्रतिनिधी ) – वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची जोडणी पूर्ववत करण्याची व आगामी ३ महिने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी १५ मार्च रोजी विधिमंडळात केली होती. शेतकऱ्यांनी वीजबिले भरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत खान्देशातील शेतकऱ्यांनी १० दिवसांत कृषी वीजबिलांचे १० कोटी ७० लाख रुपये भरले आहेत.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच निर्लेखन सवलतीमुळे वीज बिलाच्या थकबाकीचा बोजा कमी झाला आहे. यानंतरही जी थकबाकी उरली आहे, त्यातील ५० टक्के रकमेचा भरणा ३१ मार्चपर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. त्यामुळे शेतकरी वीजबिल भरण्यास पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी घोषणा केल्यानंतर जोडणी पूर्ववत करण्याचे काम महावितरणने युद्धपातळीवर केले. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित होणार नाही हे माहीत असूनही शेतकरी बिल भरण्यासाठी पुढे आले. १६ ते २५ मार्च या १० दिवसांत जळगाव जिल्ह्यात ६ कोटी ५७ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यात २ कोटी ७९ लाख तर धुळे जिल्ह्यात १ कोटी ३४ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणनच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.