जामनेर ( प्रतिनिधी ) – आमदार गिरीश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांच्या विवाहासाठी आज जामनेरात आलेल्या भाजप नेत्यांनी विरोधकांवर टीका करीत राजकारण पुन्हा तापवले .
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना घेरले . नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता त्यांना पाठीशी घालणे , काश्मीर फाइल्स चित्रपटाचा वाद , एमआयएमचा महाविकास आघाडीत समावेशाचा मुद्दा , राज्यातील गुन्हेगारी , हिंदुत्वाची राजकीय भूमिका , शिवसेनेला गोव्यात आलेले अपयश , किराणा दुकानावर वाईन विक्रीला परवानगी आदी मुद्दे आज जामनेरात तापवले गेले .
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस , केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार , माजी आमदार स्मिता वाघ , आमदार चंद्रशेखर बावनकुळे आयडी मान्यवरांची या विवाह सोहळ्यात उपस्थिती होती .