पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसमणी येथे शेतीच्या वादातून पोटच्या मुलाकडून आई-वडीलांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली पारोळापोलीस ठाण्यात मुलासह सुन व नातवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दशरथ राजाराम पाटील (वय-८५ , रा. शिरसमणी ता. पारोळा ) हे पत्नी साखरबाईसह वास्तव्याला आहे. शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. शेती नावावर करून द्यावी यासाठी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू पाटील याने १९ मार्चरोजी सकाळी आईवडील त्यांच्या घरी ओट्यावर बसलेले असतांना वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने दुखापत केली. महादूची पत्नी संगिताबाई, मुलगा योगेश आणि गणपत यांनी साखरबाई यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह सून व नातवांविरोधात तक्रार दिली. आरोपी महादू पाटील, सुन संगिता पाटील, नातू योगेश पाटील आणि गणपत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधीर चौधरी करीत आहेत .