जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील नवंनिर्वाचित संचालक मंडळ व विशेषतः बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी अल्पावधीत केलेल्या आपल्या कामगिरीचा आशादायी परिणाम थकीत कर्ज वसुलीतून शेतकरी सभासदांना प्रत्ययास येत आहे. थकीत कर्ज वसुली संदर्भात संबंधित कर्जदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांसह विविध कार्यकारी सोसायटीच्या गट सचिवांचा उत्साह वाढविणारा आहे. कोणताही गाजावाजा न करता सुरू असलेली ही मोहीम बँकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे. बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर श्री देवकर यांनी बँकेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, म्हणून कामकाजाचा परिणामकारक अजेंडाच तयार करून त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरू केली आहे. साधारणपणे सुमारे एक हजार कोटींची थकबाकी असून ती वसूल करण्याचे आव्हानही तेवढेच मोठे आहे. तथापि केवळ आव्हानाचे रडगाणे गात बसण्यापेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित केल्याने अल्पावधीतच सुमारे 55 कोटींची थकबाकी वसूल करता आलेली आहे. मार्च 2022 अखेर 500 कोटीचे टार्गेट श्री देवकर यांनी निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही वसुलीची मोहीम प्रभावी व परिणामकारक व्हावी, म्हणून बँकेच्या मुख्यालयात तालुकानिहाय बैठका घेतल्या जात आहे, स्वतः श्री देवकर या बैठकीना मार्गदर्शन करून रोजच्या रोज आढावा घेत आहेत. त्यासाठी सम्पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे, विशेष म्हणजे स्वतः अध्यक्षही थकबाकीदारांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांची दखल थकबाकीदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा मृदु स्वभाव व प्रत्येकाबद्दल असलेली सन्मान तसेच आपुलकीची भावना देखील या मोहिमेसाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सहकारी अथवा सार्वजनिक संस्थात्मक कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि शेतकरी समाजाशी असलेले विश्वासाचे नाते ही देखील त्यांची जमेची मोठी बाजू आहे.
व्याज विरहित वसुली…
ज्या शेतकरी सभासदांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांकडून मुद्दल रकमेचीच वसुली गट सचिवांनी करावी, असे निर्देशही बँकेने दिले आहेत, ही बाब देखील शेतकऱ्यांना दिलासादायक वाटत आहे. त्यामुळे पीक कर्ज वसुलीचे यंदा प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची मोठी थकबाकी आहे, ती तर वसूल झालीच पाहिजे, पण त्या बरोबर हे कारखाने बंद पडू नयेत, अशी भूमिका श्री देवकर यांची आहे. त्यासाठी पर्यायी मार्गही शोधण्याचे प्रयत्न बँकेने सुरू केले आहेत. वर्तमान स्थितीत ज्या पद्धतीने व सर्वांना सोबत घेऊन ज्या विचाराने जिल्हा बँक वाटचाल करीत आहे, ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायी म्हणता येईल…
सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव