जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर व शेंदुर्णीतील लाभार्थ्यांना रेशन दुकानदारांकडून मोफतचे धान्य नियमितपणे मिळावे, अन्यथा शिवसेना कडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
जामनेर शहरात 14 तर शेंदूर्णी गावात 7 रेशनची दुकाने आहेत. काही दिवसांपासून लाभार्थ्यांना दुकानदारांकडून मोफत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी ते आज पावेतो लाभार्थ्यांना मोफत धान्य न मिळाले मुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.काही दुकानात माल आल्यामुळे तर काही दुकानात माल न आल्याने लाभार्थ्यां मध्ये दुकानदार व प्रशासनाच्या भूमिके बाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.जानेवारी ते आजपावेतो लाभार्थ्यांना न मिळालेले मोफत धान्य लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जामनेर शहर शिवसेना पदाधिकारी अध्यक्ष अतुल सोनवणे, अँड भरत पवार, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.