जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील डिक्साईन शिवारात असलेल्या ऊसाला शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याने यात दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रिधुर येथील रहिवाशी विलास रामदास जगताप यांचे डिक्साई शिवारात शेत आहे. त्यांनी शेतात उसाची लागवड केली आहे. दरम्यान शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट झाल्याने लागलेल्या आगीत दीड एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी पाणी आणून आगीवर पाण्याचा मारा केला परंतू आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्यात यश आले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अनिल तायडे करीत आहेत.