मनपा अग्निशमन दलाच्या बंबांनी मिळवले आगीवर नियंत्रण
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरसोद येथे प्रसिद्ध गणपती मंदिरा जवळ असणाऱ्या औषध बारदानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये मुद्देमाल व साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जळगाव मनपा अग्निशमन दलाला पाचारण केले होते.
राजेंद्र रामसिंग राजपुत (वय ४०) यांनी तरसोद येथील त्यांच्या शेतामध्ये बारदानाचे गोडाऊन तयार केले होते. या ठिकाणी रात्री अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ जळगाव मनपा अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी ग्रामस्थांनी धावपळ करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी तरसोद गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. नशिराबाद पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नोंद करण्याचे काम सुरू केले होते.
दरम्यान ही आग कशामुळे लागली आणि या आगीमध्ये किती रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला याची माहिती मिळाली नाही. मंगळवारी पंचनामा झाल्यानंतरच कळेल असे पोलिसांनी सांगितले.