जळगाव (प्रतिनिधी) – पंचर काढायला दुचाकी ढकलत घेऊन जात असताना समोरुन येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगवामधील भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर घडली आहे. दोन मित्रांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अमोल दिपक सोनवणे आणि पंकज भारत भोई अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही भडगावमधीलच रहिवासी आहेत. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
भडगावच्या यशवंतनगर भागातील दीपक सोनवणे यांची बाईक पंचर झाली होती. यासाठी त्यांनी आपल्या मुलाला पंचर काढून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार सोनावणे यांचा मुलगा अमोल सोनावणे आणि त्याचा मित्र पंकज भोई हे पंचर काढण्यासाठी दुचाकी ढकलत घेऊन चालले होते. यावेळी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आसपास हॉटेल राज पॅलेस जवळ समोरुन येणाऱ्या इको गाडीने या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी पंकजला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल विजय जाधव हे करीत आहेत.