जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा कारागृहात एका बंद्याने मध्यरात्री रूमालाने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहाती बॅरेक ३ मध्ये ५ महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यात कैद असलेल्या संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) रा. खेडी बु ॥ ता. जळगाव याने मध्यरात्री लोखंडी गजाला रुमालाची दोरी करून गळ्याला फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोबत असलेल्या कैद्याच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरड केली व त्याचे पाय धरून ठेवले. यावेळी जिल्हा कारागृहात रात्रील गस्त असलेले जेल पोलीस शिपाई राजू ढोबाळ, नदीम शहा, गजानन राठोड, धिरज शिंदे, राजेंद्र सावकारे यांनी धाव घेऊन अमोल सोनवणे याला तात्काळ त्याला खाली उतरले व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत जेल पोलीस शिपाई राजू भवानीसिंग ढोबाळ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी अमोल सोनवणे हा गेल्या ५ महिन्यांपासून जळगाव जिल्हा कारागृहात बांधकाम ठेकेदाराच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. खुनाच्या संशयावरून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.