जामनेरचे शेतकरी तापी महामंडळापुढे हतबल
जळगाव ( प्रतिनिधी ) – हायकोर्टाने दिलेली मुदत संपली असूनही प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या भरपाईची रक्कम ७१ कोटी ६९ लाख रुपये मिळत नसल्याने ५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आअजपासून तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे .
जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील भगवान पाटील आणि लक्ष्मण मोहिते , भराडी येथील भीमराव पाटील , पाळधी येथील विकास सोनवणे व कापूसवाडी येथील दिलीप जाधव अशी या उपोषणकर्त्यांची नवे आहेत . या उपोषणकर्त्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आम्हाला १०० टक्के भरपाई देण्याचे आदेश देताना हायकोर्टाने सरकारला दिलेली मुदत संपलेली आहे . या उपोषणाची नोटीस आम्ही २१ जानेवारीरोजी दिली होती . २७ जानेवारीरोजी आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईत समक्ष भेटून तक्रारही दिली होती . या प्रकल्पासाठी ज्यांची शेती संपादित करण्यात आली त्यापैकी काही शेतकऱ्यांना ४ वर्षात २ टप्प्यांत त्यांचा मोबदला देण्यात आला आहे . मात्र या ५ शेतकऱ्यांना अद्याप काहीच भरपाई मिळालेली नाही . संबंधित अधिकारी शासनाची आणि शेतकऱ्यांचीही दिशाभूल करीत आहेत . १३ फेब्रुवारीपर्यंत आम्हाला आमची भरपाईची रक्कम न मिळाल्यास १४ फेब्रुवारीरोजी आम्ही पाळधी साठवण तलावात जलसमाधी घेउ असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे . आमची भरपाईची रक्कम ४ महिन्यांपासून तापी महामंडळाकडे बिनव्याजी पडून आहे या नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात यावी . या भरपाईबद्दल हायकोर्टाने २०१७ साली दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा , अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे .