बुलढाणा ( प्रतिनिधी ) – कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यावरच अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे मध्यरात्री सुमारास घडला.
एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलीस माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर डीजे बंद झाला. काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला पोलीस ठाण्याची हल्लेखोरांनी तोडफोड केली या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची या जमावाने तोडफोड केली. 10 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. थेट पोलीस ठाण्यावर समाजकंटकांनी हल्ला करत तोडफोड केल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.