अमळनेर ( प्रतिनिधी ) – रस्त्यावर नागरीकांना अडवून बेदम मारहाण व लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एकाला अमळनेर पोलीसांनी अटक केली. दोघांना न्यायालयाच्या आदेशान्वये बेड्या ठोकून भररस्त्यातून धिंड काढली यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
सराईत गुन्हेगार शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख (वय-२३ , रा. संविधान चौक, अमळनेर ) आणि राहूल किशोर वानखेड ( रा. लोण चरम ता. अमळनेर ) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत .
अमळनेर शहरातील शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद याच्यावर अमळनेर, चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने व्यक्तींना हेरून बेदम मारहाण व दरोडा टाकणे, रस्तालुट करणे या आरोपांवरून आतापर्यंत वेगवेगळ्याप्रकारचे २३ गंभीर गुन्हे दाखल आहे. २ फेब्रुवारी रोजी संशयित शुभम देशमुख अमळनेर शहरात पत्नी व सासुकडे आल्याची गोपनिय माहिती अमळनेरचे पो नि जयपाल हिरे यांना मिळाली. पोउनि शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ सुनिल हटकर, पो ना दिपक माळी, मिलींद भामरे, सुर्यकांत साळुंखे, रविंद पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, रोहिदास आगोणे, सागर साळुंखे गलवाडे रोड प्रताप मिल येथे सापळा टाकून पकडण्यासाठी गेले असता आरोपी शुभम देशमुखने पोलीसांना पाहून भिंतीवरून उडी घेवून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात पायाला दुखापत झाल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचा साथिदार राहूल वानखेडे यालादेखील त्याच्या घरातून दुसऱ्या पथकाने अटक केली. यापुर्वी देखील शुभम पोलीसांच्या तावडीतून सुटू पसार झाला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बेड्या ठोकल्या.
शुभम देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरीकांकडून बळजबरीने पैसे घेवून जनतेत दहशतीचे वातावरण पसरवत असल्याने नागरीक व व्यापारी यांच्या मनातील भीती दुरू करण्यासाठी अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक दरम्यान दोघांना बेड्या ठोकत पायी धिंड काढली.