जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात शहरी भागात उद्यापासून इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी मान्यता दिली आहे . तशा सूचना सर्व गट शिक्षणाधिकारी , जळगाव महापालिकेचा शिक्षण विभाग , नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .
या आदेशात म्हटले आहे की , ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात येणार असल्या तरी शहरी भागात स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्या त्या भागातील शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत . स्थानिक शाळा समितीची सहमान्यता शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक आहे . शाळांमध्ये कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खेळांच्या स्पर्धा आयोजित करू नये . राज्य सरकारच्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे . वैद्यकीय कारणांमुळे डॉक्टरांनी नाकारले असेल असे कर्मचारी वगळता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल . आरोग्य खात्याशी समन्वय साधून १५ ते १७ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सर्व वर्गशिक्षक , मुख्याध्यापक , शिक्षण विस्तार अधिकारी यांची राहील . संबंधित अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन नियमितपणे परिस्थितीचा आढावा घ्यावा .