जळगाव (प्रतिनिधी ) – बनावट अपंग प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या रावेर पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनेश कडू भोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, रावेर पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे आठ ग्रामसेवकांनी शासनाकडे अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून विविध प्रकारच्या घेतल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यात नितीन दत्तू महाजन ,राहुल रमेश लोखंडे , रवींद्रकुमार चौधरी , श्रीमती छाया रमेश नेमाडे, शामकुमार नाना पाटील वरील सर्व ग्रामसेवक तर ग्रामविकास अधिकारी अरविंद सुधाकर कोलते, अनिल किसन वराडे, आणि ग्रामसेवक विजय पांडुरंग पाटील यांनी अपंगत्व प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे ३०/७/२०२१ रोजी रावेर येथील गटविकास अधिकारी यांनी पाठविली होती. त्यात वरीलपैकी सर्व आठ ग्रामसेवक यांना कोणतेही अपंगत्व नसल्याचा अहवाल ८/१०/२०२१ रोजी दिला असून तो अहवाल रावेर पंचायत समिती कार्यालयाला १२/१०/२०२१ रोजी प्राप्त झाला आहे . त्यांनी दाखल केलेल्या बनावट दाखल्यांची सखोल चौकशी करण्यात येऊन निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी केले आहे.